इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी!
मनमाड(प्रतिनिधी) :- इंदूर-पुणे महामार्गावरून मनमाड शहराजवळील अंकाई किल्ला परिसरात असलेल्या अशोकबाबा आश्रमासमोर एक दुचाकी आणि अज्ञात वाहनाचा जोरदार अपघात झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही येवला तालुक्यातील देशमाने येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघात करून अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी इंदूर-पुणे महामार्गावरील अंकाई बारी जवळील अशोकबाबा आश्रमासमोर हा थरारक अपघात घडला. येवला तालुक्यातील देशमाने येथील तीन रहिवासी मोटारसायकलवरून जात असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर दोन जण रक्ताच्या थारोळ्यात पडले.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू करत रुग्णवाहिका बोलावली. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना तात्काळ उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघात घडल्यानंतर धडक देणारे अज्ञात वाहन घेऊन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























