नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप
नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे हे आपल्या पदाचा गैरवापर करून विद्यमान आमदार सुहास कांदे आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी थेट ‘स्टार प्रचारक’ म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. या राजकीय हेतूने प्रेरित कामासाठी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा अमानुष छळ केला जात असून, शिक्षण क्षेत्रातून यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गटशिक्षणाधिकारी नाईकवाडे हे तालुक्यातील शिक्षकांवर बळजबरीने राजकीय प्रचार कार्यात सहभागी होण्यासाठी दबाव टाकत आहेत. जे शिक्षक याला नकार देतात किंवा शासकीय नियमांचे पालन करू इच्छितात, त्यांना थेट बदली किंवा निलंबन करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. शासकीय अधिकाऱ्याने अशा प्रकारे राजकीय पक्षाचा अजेंडा राबवणे आणि शिक्षकांना वेठीस धरणे अत्यंत बेकायदेशीर असल्याच्या भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहेत.दुसरीकडे, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (दप्तर व वह्या) वाटप करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. मात्र, या मोफत साहित्यावर आणि वह्यांवर थेट आमदार सुहास कांदे यांचे फोटो आणि त्यांच्या राजकीय पक्षाचे चिन्ह छापण्यात आले आहे. शासकीय किंवा निमशासकीय शाळांमधील निष्पाप विद्यार्थ्यांचा वापर अशा प्रकारे राजकीय जाहिरातबाजी आणि पक्षाच्या प्रचारासाठी करणे हे शिक्षण विभागाच्या नियमांचे सरळ-सरळ उल्लंघन आहे. सोशल मीडियावर स्वतः आमदार आणि त्यांच्या समर्थकांकडून या कार्यक्रमांचे फोटो व वेळापत्रक उघडपणे शेअर केले जात आहेत, ज्यामुळे या आरोपांना बळकटी मिळत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांवरील आरोपांची मालिका एवढ्यावरच थांबत नाही. शालेय शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत प्रशिक्षण कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार (भ्रष्टाचार) झाल्याचा आरोप अनेक शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. शिक्षकांच्या भत्त्यांमध्ये आणि प्रशिक्षणाच्या सोयी-सुविधांमध्ये कपात करून लाखो रुपयांचा निधी लाटल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, नाशिक हा जिल्हा राज्याच्या शिक्षणमंत्र्यांचा गृहजिल्हा मानला जातो. तसेच दादा भुसे यांच्या मतदारसंघाला लागूनच असलेल्या या नांदगाव तालुक्यात शिक्षण विभागाचा असा उघड आणि भोंगळ कारभार सुरू आहे. एवढ्या तक्रारी होऊनही संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने, त्यांना बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचा संशय बळावला आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा परिषद प्रशासन आणि वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे दिसते आहे.एकीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे शिक्षकांना धमकावून राजकारणात ओढले जात असल्याने पालक आणि संतप्त शिक्षकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे की—”या भ्रष्ट आणि नियमबाह्य कारभारावर वरिष्ठ प्रशासन किंवा निवडणूक आयोग अखेर कधी कारवाई करणार?”

विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; ट्रॅक्टरमधून अवैध वाहतूक
आमदार सुहास कांदे यांचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या वह्या-दप्तर वाटप कार्यक्रमाला गर्दी दाखवण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील निष्पाप विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात आले. ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांवरून कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कोंबून प्रवास करण्यास भाग पाडले गेले. जर एखादा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शासकीय नियमांनुसार शालेय विद्यार्थ्यांची अशा प्रकारे मालवाहू वाहनातून वाहतूक करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरतो.गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























