मनमाड शहरात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या नंतर आंबेडकरवादी संविधान प्रेमी व भीमसैनिकांचा जल्लोष; फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटले
मनमाड (प्रतिनिधी):NEET-UG परीक्षेतील कथित घोटाळा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांचे तीव्र आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला अखेर मोठे यश आले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला आहे.केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मनमाड शहरात आंबेडकरवादी संविधान प्रेमी व भीमसैनिकांच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मनमाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंबेडकरवादी संविधान प्रेमी
आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘मनुवाद के छातीपर आंबेडकर आंबेडकर’, ‘विद्यार्थी एकतेचा विजय असो’ घेतला रे घेतला राजीनामा घेतला अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुतळा परिसरात प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी केली. आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसमोर अखेर केंद्र सरकारला नमावे लागल्याचे सांगत, कार्यकर्त्यांनी उपस्थित नागरिकांना आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या ऐतिहासिक आंदोलनापुढे झुकत मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे हा देशभरातील विद्यार्थ्यांचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या जल्लोष आंदोलनात मनमाड शहरातील गुरुकुमार निकाळे,विलास आहिरे,प्रवीण पगारे,विशाल पाटील,रवी निकम, बॉबी पवार भय्या निकम सोनू गवळे,किरण भालेराव, एस एम भाले, कदीर शेख,ऍड आम्रपली निकम,सूरेश आहिरे,श्रीकृष्ण पगारे,कांबळे बाबुजी, सिद्धांत पाटील,अमोल लंकेश्वर,यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भीमबांधव उपस्थित होते.

























