मनमाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी; अतिक्रमण आणि नोकरभरतीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सभागृह गाजले!
मनमाड(प्रतिनिधी) :- मनमाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा प्रचंड वादविवाद आणि गोंधळात पार पडली. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसमोर आलेल्या एकूण २४ विषयांपैकी एका विषयाला स्थगिती देण्यात आली, तर उर्वरित २३ विषयांना किरकोळ वादविवादानंतर मंजुरी देण्यात आली. मात्र, आयत्या वेळच्या विषयांमध्ये शहरातील अतिक्रमण मोहीम आणि आस्थापना विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले लाड पागी समितीच्या अनुसरून एकही वारसाला नोकरी देण्यात येत नसुन पालिकेच्या आस्थापना विभागाचे वतीने आर्थिक लाभ करून घेत परस्पर नोकरी विकण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला आहे.
आजच्या सर्वसाधारण सभेत मनमाड नपालिकेने ३० जून रोजी शहरात राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेत मोठा दुजाभाव केल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अमजद पठाण आणि राकेश ललवाणी यांनी केला. प्रशासनाने केवळ एका विशिष्ट समाजाच्या अतिक्रमणांना लक्ष्य केल्याचे सांगत दोन्ही नगरसेवकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. “मुख्याधिकार्यांनी शहरात भेदभाव करत कारवाई केली आहे. आता शहरातील उर्वरित भागांतील अतिक्रमण कधी निघणार?” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावर उत्तर देताना मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी, “१० ऑगस्टपर्यंतची मुदत द्या, त्यानंतर शहरातील उर्वरित सर्वच अतिक्रमणांवर निष्पक्षपणे कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले. तर ‘१० लाख रुपये द्या, नोकरी घ्या’; असा खळबळजनक व गंभीर आरोप आस्थापना विभागावर सभेत सत्ताधारी गटाचेच नगरसेवक आमिन पटेल यांनी केला. पालिकेचा आस्थापना विभाग पैसे खाऊन काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. “शहरात ‘८ ते १० लाख रुपये द्या आणि पालिकेत नोकरी मिळवा’ असे सांगणारे एजंट फिरत आहेत. पालिकेच्या नोकरभरतीत प्रचंड अनियमितता झाली असून, खऱ्या वारसदारांना बाजूला सारून भलत्याच लोकांची भरती करण्यात आली आहे,” असा थेट आरोप पटेल यांनी केला. लोकप्रतिनिधी असूनही आपल्याला माहिती दिली जात नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग निवडण्यावाचून पर्याय उरला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली तर बाबा दराडे हे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले याशिवाय ते नगरसेवक यांना कचरा समजत असुन खऱ्या वारसदारांना तर एका दिवसात त्यांचा अर्ज निकाली काढून त्यांची नोकरी इतराना विकत असल्याचा आरोप केला व हे मी प्रूफ करून देईल असेही त्यांनी सभेत सांगितले.सत्ताधारी गटाचे दुसरे नगरसेवक डॉ. सुहास जाधव यांनी पालिकेच्या अधिकार्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. “पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रभागातील विकासकामे सांगितली, तर ते थेट आमचे फोन नंबर ब्लॉक करतात. लोकप्रतिनिधींचे फोन ब्लॉक केले तर आम्ही जनतेची कामे सांगायची कोणाला?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असूनही प्रशासनाकडून कामे होत नसल्याचे त्यांनी उघड केले.
कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत; विरोधक आक्रमक
विरोधी पक्षाचे नगरसेवक अमोल नरवडे आणि बापू दराडे यांनीही प्रशासकीय कारभारावर जोरदार हल्ला चढवला. पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने कामात दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवकांनी वारंवार सूचना देऊन आणि मागण्या मांडूनही प्रभागांतील कामे रेंगाळत ठेवली जात आहेत, जी लोकशाहीत अत्यंत चुकीची बाब आहे, असे नरवडे व दराडे यांनी ठणकावून सांगितले.एकंदरीत, २४ पैकी २३ विषयांना मंजुरी मिळाली असली, तरीही शहराचे प्रलंबित प्रश्न, प्रशासनाचा मनमानी कारभार आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांमुळे मनमाड नगरपालिकेची ही सर्वसाधारण सभा दीर्घकाळ स्मरणात राहील अशी ठरली.
नगराध्यक्ष योगेश पाटील यांची मध्यस्थीची भूमिका..!
सत्ताधारी गटाचे नगरसेवक आक्रमक पवित्रा घेत असल्याचे तसेच विरोधी पक्षचे नगरसेवक देखील आक्रमक झाल्याचे व पालिकेच्या प्रशासकीय विभागाच्या अनेक चुका लक्षात आल्याने नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी मध्यस्थी भूमिका घेत यापुढे जर नगरसेवकांच्या तक्रारी आल्या तर त्यावर मी स्वतः कायद्यात जी तरतूद असेल ती कारवाई करणार याशिवाय जे कोणी कर्मचारी कामचुकार पणा करत असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























