दिल्लीतील विद्यार्थी लाठीमार निषेधार्थ उद्या ‘महाराष्ट्र बंद’; मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचे व्यापाऱ्यांना आवाहन

मनमाड(प्रतिनिधी):- दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षा घोटाळा आणि पेपर फुटीच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्या, २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी आणि मनमाड शहरात तो यशस्वी करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि विविध समविचारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्गाची भेट घेऊन दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले व्यापाऱ्यांना आवाहन करताना उपस्थित नेत्यांनी केंद्र व दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या ऐकण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हेगारांसारखा लाठीमार करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या भवितव्यासाठी आहे, त्यामुळे सर्वांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे अशी भूमिका मांडण्यात आली.मनमाड शहरात काढण्यात आलेल्या या जनसंपर्क आवाहनादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक शहराध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातात भोंगा (लाऊडस्पीकर) घेऊन बाजारपेठेतील व्यावसायिक परिसरांमध्ये फिरत पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने बंद पाळण्याचे आवाहन केले. व्यापारी वर्गाकडूनही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उद्या २३ जुलै रोजी होणाऱ्या या बंदच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरात आवश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला जाणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























