नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) मोठा दणका; डाटा एंट्री ऑपरेटरसह खाजगी इसम १,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक! छोटा मासा गळाला मोठ्याच काय…?
नांदगांव(महेश पेवाल) : नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शेतजमिनीच्या खरेदी खतांची प्रमाणित नक्कल प्रत देण्यासाठी १,००० रुपयांची लाच स्वीकारताना एका आयटी असिस्टंट (डाटा एंट्री ऑपरेटर) आणि त्याच्या खाजगी हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी इलोसे धारासिंग बाबुलाल राठोड (वय ५३, व्यवसाय- आयटी असिस्टंट/डाटा एंट्री ऑपरेटर, नेमणूक- दुय्यम निबंधक कार्यालय, नांदगाव) आणि सागर राजेंद्र बोरसे (वय ३३, व्यवसाय- खाजगी इसम, रा. पिंपळगाव नजीक पाटोदा रोड, लासलगाव) अशा दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र दुय्यय निबंधक यांचे कार्यलाय भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणूनच ओळखले जाते ज्यांना पकडले ते तर फार छोटे मासे आहेत मोठ्या माशांच काय..? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांच्या वडिलांची पूर्वजांची शेतजमीन त्यांच्या चुलत आजोबांनी व इतरांनी परस्पर विक्री केली होती. या प्रकरणी पुढील कायदेशीर लढाई लढण्यासाठी तक्रारदार यांना सदर जमिनीच्या खरेदी खताच्या दस्तऐवजांची प्रमाणित नक्कल प्रत हवी होती. यासाठी त्यांनी १८ मार्च २०२६ रोजी नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रीतसर अर्ज केला होता.
सदर खरेदी खताची प्रमाणित नक्कल प्रत काढून देण्यासाठी शासनाचे अधिकृत ऑनलाईन चलन केवळ ३२० रुपये इतके होते. मात्र, आरोपी खाजगी इसम सागर बोरसे व लोकसेवक इलोसे राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे या कामासाठी तब्बल १,२०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती १,००० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नाशिक कार्यालयाकडे तक्रार नोंदवली.
एसीबीचा सापळा आणि रंगेहाथ कारवाई:
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ जून २०२६ रोजी नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून १,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे अधिकारी:
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी, आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, पोलीस अंमलदार पोहवा दिनेश खैरनार, पोहवा अविनाश पवार आणि चालक पोशि समीर शेख यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सूर्यवंशी करत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:
शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी अथवा कामाच्या मंजुरीसाठी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
































