मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा
मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मद्यधुंद चालकाने उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दगडफेक करत मोठा तमाशा केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, अनकवाडे शिवारातील ‘फौजी धाब्यावर’ दोन जणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता.यात तो ट्रकचालक जखमी झाला गावातील नागरिकांनी रुग्णवाहिकेला बोलवलं व त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र या वादानंतर संबंधित मद्यधुंद व्यक्तीने थेट मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर राडा घालण्यास सुरुवात केली.
उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पोहोचल्यानंतर या मद्यधुंद चालकाने आरडाओरड करत दगडफेक केली. अंगातील शर्ट काढून तो रस्त्यावर आणि रुग्णालयाच्या परिसरात धावपळ करत तमाशा करत होता. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि तेथून जाणाऱ्या नागरिकांना या धिंगाण्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
धिंगाणा घालणारा हा व्यक्ती तामिळनाडू येथील ट्रक ड्रायव्हर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख






























