मनमाडमध्ये पहिल्याच पावसात मोठी दुर्घटना: मातोश्री रमाबाई नगर येथे घर कोसळल्याने पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
मनमाड(अजहर शेख):- मनमाड शहरात पहिल्याच पावसाने भीषण थैमान घातले असून, येथील मातोश्री रमाबाई नगर भागात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पहिल्याच मुसळधार पावसामुळे एका कुटुंबाचे राहते घर अचानक कोसळले. या भीषण अपघातात घराचे मालक संजय विठ्ठल संसारे यांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेबाबतचे सविस्तर वृत्त असेंकी मातोश्री रमाबाई नगर, मनमाड (नाशिक)मध्ये मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसामुळे संजय विठ्ठल संसारे यांचे राहते घर पत्त्यांसारखे कोसळले. या अपघातात संजय विठ्ठल संसारे यांचा ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने जखमी झाले त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांची पत्नी देखील या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झाली असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहिल्याच पावसाने उडवली दाणादाण
पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने मनमाड शहरात जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसाने नागरिकांना दिलासा दिला असला, तरी या कुटुंबावर मात्र काळाने घाला घातला. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, संसारे यांचे घर हा भार सहन करू शकले नाही आणि अचानक पत्त्यासारखे कोसळले.घर कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पती-पत्नीला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.ढिगाऱ्याखालून बाहेर काढले तोपर्यंत संजय विठ्ठल संसारे हे जखमी होते त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या गंभीर जखमी पत्नीला तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
परिसरात हळहळ आणि संताप
पहिल्याच पावसाने मनमाडमधील घरांची आणि नागरी सुविधांची दैना समोर आणली आहे. संसारे यांच्या अचानक जाण्याने आणि घर उद्ध्वस्त झाल्याने मातोश्री रमाबाई नगर परिसरासह संपूर्ण मनमाड शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत संजय संसारे यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































