वाणिज्य विभागाचा इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न!
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित इंडक्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रम, विविध शैक्षणिक संधी तसेच करिअरच्या विविध वाटांची माहिती करून देणे हा होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद जी. आंबेकर होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वाणिज्य शाखेतील विविध करिअरच्या संधी, कौशल्यविकास आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता व कौशल्ये ओळखून भविष्यातील करिअरची योग्य दिशा निश्चित करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासक्रमातील DSC-1, DSC-2, OE, SEC, IKS ,CC व VEC यांसारख्या विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच रोजगारक्षम कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडी-निवडी, क्षमता व कौशल्यांच्या आधारे करिअरची निवड करण्याचे आवाहन केले. बदलत्या काळानुसार नाविन्यपूर्ण व नवीन करिअरच्या संधींचा शोध घेऊन त्या साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत. तसेच आपल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबतच समाज व परिसराच्या विकासासाठी करावा, असे त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. एस. जे. सुखदेवे यांनी विद्यार्थ्यांना विभागातील विविध अभ्यासक्रम, विषयांची रचना, शैक्षणिक उपक्रम, परीक्षा पद्धती तसेच भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास प्रा. डी. व्ही. सोनवणे, प्रा. एस एल शेंडगे, प्रा. सुहास वराडे, प्रा. पी. टी. वानखेडे, प्रा. डी टी धनगर सर, प्रा. एस. ए. वाघ सर यांच्यासह विविध विभागांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आरती छाजेड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. वसंत गायकवाड यांनी केले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वाणिज्य विभागाचा इंडक्शन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
































