चांदवड-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; मनमाडच्या दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू, शहरात शोककळ

मनमाड(प्रतिनिधी ):चांदवड-मनमाड महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. या अपघातात मनमाड येथील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. शफीक फिटर आणि सागर बेदाडे अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुण मित्रांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मनमाड शहरात कमालीची खळबळ उडाली असून सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शफीक आणि सागर हे दोन्ही मित्र काही कामानिमित्त नाशिक येथे गेले होते. नाशिकहून आपले काम आटोपून आज पहाटेच्या सुमारास ते इर्टीगा कारने मनमाडकडे परत येत होते. दरम्यान, चांदवड-मनमाड महामार्गावरून प्रवास करत असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेली भरधाव कार रस्त्याशेजारी असलेल्या एका मोठ्या झाडावर जाऊन प्रचंड वेगाने आदळली.हा अपघात इतका भीषण होता की, यात इर्टीगा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

गाड्याच्या झालेल्या ढिगाऱ्यावरून अपघाताच्या तीव्रतेची भीषणता स्पष्ट दिसून येत आहे. या जोरदार धडकेमुळे कारमधील शफीक फिटर आणि सागर बेदाडे या दोन्ही तरुणांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह गाड्यातून बाहेर काढून शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मनमाडमधील दोन उमद्या तरुणांचा अशा अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघात प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























