मनमाड नगरपालिकेत मुकादमाची मनमानी; प्रभागात घाणीचे साम्राज्य तर दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचे मुकादमाच्या जिवावर ‘फुकटचे पगार’ सुरू; मुख्याधिकारी कारवाई करणार का?

मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ आणि १६ मध्ये स्वच्छता विभागाच्या मुकादमाकडून (मुकारदम) अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या मुकादमाच्या ढिसाळ आणि पक्षपाती नियोजनामुळे प्रभागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, शासकीय पगार घेऊनही कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा मुकादम पाठीशी घालत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुकादमाचा स्थानिक राजकारणात सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत आहे. प्रभागातील काही विशिष्ट नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी सांगतील त्याच भागात आणि त्याच लोकांच्या घरासमोर स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते. ज्या गल्ल्यांमध्ये किंवा भागात “काम करू नका” असे आदेश दिले जातात, तिथे हा मुकादम किंवा त्याचे कर्मचारी फिरकतही नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांना घाणीचा सामना करावा लागत असून, मुकादमाच्या या राजकीय पक्षपातीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रभागाची जबाबदारी साधारणपणे १६ कर्मचाऱ्यांवर असताना, प्रत्यक्षात मात्र दररोज केवळ ४ ते ५ कर्मचारीच काम करताना दिसतात. उर्वरित ९ ते १० कर्मचारी नेमके कोण आहेत? ते कधी कामावर येतात आणि कधी जातात? याची प्रभागातील कोणालाही माहिती नाही. धक्कादायक बाब म्हणजे, हे गायब असणारे कर्मचारी मनमाड शहरात न राहता चक्क बाहेरगावी राहतात, तर काही जण इतर ठिकाणी स्वतःचे खाजगी व्यवसाय किंवा इतर कामे करतात, अशी माहिती समोर येत आहे.कामावर न येता केवळ कागदोपत्री हजेरी लावण्यासाठी या गायब कर्मचाऱ्यांकडून संबंधित मुकादमाला दरमहा ठराविक रक्कम (लाच) दिली जाते, अशी दबक्या आवाजात प्रभागात जोरदार चर्चा आहे. या आर्थिक लागेबांध्यांमुळेच मुकादमाने या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना मोकळे रान दिले असून, गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी शासनाची आणि जनतेच्या करातून मिळणाऱ्या पैशांची उघडपणे फसवणूक करत ‘फुकटचा पगार’ लाटत आहेत.या मुकादम बाबत महिन्या भरापासून लेखी तक्रार दाखल असूनही आरोग्य निरीक्षक व मुख्याधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे मनमाड शहरातील मोजकेच सफाई कर्मचारी हे प्रामाणिकपणे काम करतात तर बाकीचे सर्वच सफाई कर्मचारी हे फायदा सफाई कर्मचाऱ्याचे घेतात आणि काम मात्र ऑफिसमध्ये बसुन करतात याकडेही मुख्याधिकारी साहेबांनी लक्ष देण्याची गरज आहे.शहरातील एकही मुकादमचा सबंधित विभागाचा ‘सॅनिटरी इन्स्पेक्टर’ हा कोर्स झालेला नाही यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.
आरोग्य निरीक्षक अनभिज्ञ; मुख्याधिकारी कारवाई करणार का?
या सर्व गैरप्रकाराबाबत नगरपालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. मुकादमाने वरिष्ठांचे डोळे पुसून आपला हा काळा कारभार सुरू ठेवल्याचे दिसते. शासनाचा महसूल आणि जनतेचे आरोग्य पणाला लावून सुरू असलेल्या या भ्रष्ट कारभारावर आता मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी कठोर कारवाई करणार का? संबंधित मुकादमाची चौकशी करून त्या गायब कर्मचाऱ्यांचे पगार रोखले जाणार का? असा थेट सवाल मनमाडमधील सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार..!
संबंधित मुकादम हा पक्षपातीपणा करून काम करत आहे याशिवाय तो अनेक किती कामे करतो तसेच राजकीय हस्तक्षेप करून एकाला वेगळा न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय देण्याचे काम करतो याबाबत या मुकादमची त्याची ज्या ठिकाणी ड्युटी असेल त्या ठिकाणी त्याची बदली करावी यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील व मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे मात्र महिना उलटला तरी अद्याप त्याच्यावर कारवाई न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे





























