वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद .
केंद्र सरकार आणि मोदी प्रशासनाच्या धोरणांचा निषेध

मनमाड(प्रतिनिधी) :- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मनमाडमधील मुख्य बाजारपेठ, भाजी बाजार आणि व्यापारी संकुले सकाळपासूनच पूर्णपणे बंद होती. व्यापारी असोसिएशन आणि स्थानिक दुकानदारांनी स्वतःहून पुढाकार घेत आपली दुकाने बंद ठेवली. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला . या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेते, विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत ‘मोदी सरकार विरोधी’ जोरदार घोषणाबाजी केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी आज पेपरफुटी विरोधात आणि मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती याला आज राज्यभरात पाठिंबा मिळाला असुन मनमाड शहरात देखील हा बंद 100 टक्के यशस्वी झाला आजच्या या बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष,ऑल इंडिया पँथर सेना,बहुजन समाज पार्टी,फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच,भारत मुक्ती मोर्चा,भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल यांच्यासह विद्यार्थी आणि शहरातील महिलांनी पाठींबा दर्शवला होता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा असलेला लक्षणीय सहभाग. हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन महिलांनी सरकारच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. शांततेच्या मार्गानं पण तेवढ्याच आक्रमकपणे मनमाडकरांनी या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला.बंदच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने मुख्य चौकांमध्ये आणि संवेदनशील भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन पार पडले.आंदोलनाच्या शेवटी मंडल अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले.आजच्या बंदमधे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे,कदीर शेख,आनंद शिनगारे,बसपाचे प्रवीण पगारे,गुरुकुमार निकाळे,रवी निकम,दीपक गरूड,ऍड आम्रपली निकम,प्रा विनोद आहिरे यांच्यासह इतर शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता.
मनमाड बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद…!मनमाड शहर आंबेडकर चळवळीचे शहर म्हणून ओळखले जाते देशातील अनेक मोठी आंदोलन झाले तर त्याचे पडसाद मनमाड शहरात उमटतात खास करून शहरातील सर्वपक्षीय बंद असो वा आंबेडकर चळवळीच्या वतीने पुकारण्यात आलेला बंद याला मनमाड शहरातील व्यापारी कायम साथ देतात आजच्या बंदला देखील व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला त्यामुळे आजचा बंद देखील 100 टक्के यशस्वी पार पडला.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























