मनमाडमध्ये रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे अपघातांचा धोका; प्रशासनाने तातडीने नियोजन करावे – फिरोज शेख यांची मागणी
मनमाड (प्रतिनिधी):शहरातील मनमाड नांदगाव मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या दिवसेंदिवस वाढत चालला असून, यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, प्रशासनाने मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस व सुनियोजित मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे मनमाड कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी केली आहे.मुळात जनावरे पकडण्यासाठी देण्यात आलेला ठेका फक्त ठेकेदार पोसण्यासाठी आहे का..? पालिकेच्या वतीने त्यांना लाखो रुपयांची बिल अदा करण्यात येतात मग काम का होत नाही असाही संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील मुख्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर जनावरांचे कळप भररस्त्यात बसलेले पाहायला मिळतात. रस्त्याच्या मधोमध जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. तसेच अवजड वाहने, गॅस, डिझेल, पेट्रोल टँकर आणि मालवाहू ट्रक्सची सतत वर्दळ असणाऱ्या मार्गांवर अचानक समोर जनावर आल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळी तर पथदिव्यांचा अभाव किंवा अंधार असल्यास ही जनावरे वेळेवर न दिसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. “शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता नगरपरिषद व स्थानिक प्रशासनाने मोकाट जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच पकडलेल्या जनावरांसाठी कोंडवाड्यांची सोय करून एका सुनियोजित आराखड्यानुसार ही मोहीम राबवावी. वारंवार होणाऱ्या अपघातांची वाट न पाहता प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.”असेही फिरोज शेख म्हणाले याशिवाय जनावरे पकडण्यासाठी देण्यात आलेला ठेका हा काय केवळ ठेकेदार पोसण्यासाठी आहे का ..? ठेकेदार काम करत नसेल तर त्याला बिल अदा करू नये असेही शेख म्हणाले.प्रशासनाने या समस्येची तत्काळ दखल घेऊन योग्य नियोजन न केल्यास नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी विचारमंचाच्या वतीने देण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख






























